नगर – मराठा समाजाला आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची घेतलेली शपथ पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यांनी शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल तर पुन्हा राज्य मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण कशासाठी केले जात अाहे?, असा परखड सवाल महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. नगर येथे आयोजित ओबीसी महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, कल्याणराव दळे, शब्बीर अन्सारी आदींसह ओबीसी समाजातील नेतेमंडळी उपस्थित होती. भुजबळ म्हणाले, जेथे ओबीसी राहतात तेथे दहशत निर्माण केली जात आहे. मारहाण केली जात आहे. लोक गाव सोडून जात आहेत.
ओबीसी मुख्यमंत्री करा….
आता तुम्हाला संधी येत आहे. दलित, ओबीसी, मुस्लिम सगळे एकत्र या आणि मतपेटीवर हल्ला करा. एकही निवडणूक सोडू नका. सगळीकडे ओबीसी निवडून आले पाहिजे, असे म्हणत येत्या २०२४ च्या निवडणुकीत राज्यात बहुजन सरकार आणि ओबीसी मुख्यमंत्री करण्याची घोषणा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली.
१६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा…
मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेतेसुद्धा बोलताहेत. काल एक जण बडबडला की, भुजबळच्या कंबरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. पण १७ नोव्हेंबरला ओबीसींची पहिली रॅली अंबडला झाली. त्यापूर्वी १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सभेला गेलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले होते वाच्यता नको, त्यामुळे अडीच महिने मी शांत राहिलो, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला. काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत ओबीसींसाठी लढत राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.