महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या राजकीय घडामोडींमध्ये आज शिवसेना आणखी एक मोठे पाऊल टाकू शकते. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांचा पक्ष आज प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी (VBA) सोबत युती करू शकतो. दादर येथील आंबेडकर भवन येथे दुपारी होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाची ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टी’सोबत युती करण्याची घोषणा केली होती. ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टी’चे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे हे आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक मानले जातात. त्याचवेळी वैचारिक मतभेद असतानाही उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर आपला राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी एकत्र येत आहेत. आगामी काळात महाराष्ट्रातील स्थानिक व नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही युती करण्यात येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, एकीकडे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर युतीची घोषणा करणार आहेत. तर दुसरीकडे या आघाडीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनेक दलित नेत्यांच्या बैठका घेतल्या आहेत.