
पुणे : वाइन शॉपमधून विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोकड असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरणाऱ्या गुन्हेगारांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध यापूर्वी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सलग १५ दिवस अडीचशे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला.

ओंकार ऊर्फ पल्या सुधाकर परमवार (वय २४, रा. जुना बाजार, खडकी) आणि अरबाज मुनीर शेख (वय १९, खडकी बाजार, खडकी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवनगर भागात चोरट्यांनी एका वाइन शॉपमधून विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोकड असा चार लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

गेल्या काही दिवसांत शहरात वाइन शॉपमध्ये चोरीचे प्रकार वाढले आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त ए. राजा आणि सहायक आयुक्त अश्विनी राख यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनीता रोकडे, सहायक निरीक्षक संदीप जोरे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, महेश पाठक, राहुल मोरे, स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांनी ही कारवाई केली. तपास पथकाने या भागातील सुमारे अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून सुमारे ३४ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
जाहिरात



जाहिरात
