लांजा :- जमीन जागेच्या वादातून जेसीबीच्या सहाय्याने घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचे नुकसान आणि नासधूस केल्याची घटना तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथे शुक्रवारी १९ जानेवारी रोजी दुपारी घडली होती . या प्रकरणी तिघांसह जेसीबी चालक अशा एकूण चौघांवर लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . दरम्यान , या घटनेत घरातील महिलेला शिवीगाळ करत हात धरून घरातून बाहेर काढले होते . या प्रकरणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत संबंधित व्यक्तींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली होती . त्यानंतर यातील मच्छिंद्र महेंद्र कांबळे व जेसीबी चालक यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कोचरी बेंद्रेवाडी येथील वसंत बेंद्रे आणि मच्छिंद्र महेंद्र कांबळे हे एकमेकांचे शेजारी असून त्यांच्यात जमीनवरून वाद निर्माण झाला आहे . शुक्रवार १९ जानेवारी रोजी फिर्यादी वसंत बेंद्रे हे कार्यकारी दंडाधिकारी लांजा येथे आले असताना यातील मच्छिंद्र महेंद्र कांबळे , दया शंकर कांबळे , दीप्ती महेंद्र कांबळे यांनी जमीन जागेच्या वादाच्या कारणावरून संगनमताने वसंत बेंद्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी प्रतीक्षा वसंत बेंद्रे हिला शिवीगाळ करत हात धरून घरातून बाहेर काढले आणि घरात घुसलीस तर तुझे इथेच काम करून टाकू , अशी धमकी दिली . त्यानंतर त्यांनी आणलेल्या ( क्रमांक केए २८ एमए ३१०१ ) जेसीबीद्वारे वसंत बेंद्रे यांच्या घराच्या समोरील आणि बाजूचा भाग पाडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . या प्रकरणी वसंत बेंद्रे यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . त्यानंतर सायंकाळी उशीरा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला . महिलेच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढून तिला धमकी दिल्या प्रकरणी कोचरी येथील मच्छिंद्र महेंद्र कांबळे ( वय ३४ , राहणार कोचरी बौद्धवाडी ) आणि जेसीबी चालक अनिल घनू लमाणी ( वय ३० , राहणार केळंबे स्टॉप , मूळ राहणार हरकेरी तांडा नंबर दोन , जिल्हा विजापूर , राज्य कर्नाटक ) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३५४ , ४५२ , ४५१ , ३४१ , ५०४ , ५०६ , ४२७ , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .