राजापूर :- मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्याला एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची झळ पोहचते. त्यामुळे यावर्षीच्या संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्याच्या अनुषंगाने पंचायत समितीने तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. १५ लाख ४० हजार रुपयांच्या या आराखड्यामध्ये सात गावे आणि अठरा वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये विंधनविहिरी, नळपाणी योजना, जलस्त्रोतांच्या ठिकाणचा गाळ उपसा करणे आदी विविध स्वरूपांच्या कामांचा समावेश आहे.
आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठकीनंतर गटविकास अधिकारी सुहास पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा पंचायत समिती प्रशासनाकडून मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळाल्यानंतर या आराखड्यावर अंमलबजावणी होणार असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून त्या द्वारे तालुक्याला टँकरमुक्त करण्याचे पंचायत समितीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी ग्रामस्थ, विविध सामाजिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधून त्यामध्ये पाणीसाठा करत पाणीटंचाई कमी करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. आमदार साळवी यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बैठकीमध्ये याबाबत तालुक्याचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करण्याची सूचना साळवी यांनी केली होती. त्याप्रमाणे प्रिंदावण बांदिवडे, तुळसवडे, मिळंद, महाळुंगे, अणसुरे, तेरवण, रायपाटण अशा सात गावांमधील १८ कामांचे प्रस्ताव निर्धारित कालावधीमध्ये पंचायत समितीला प्राप्त झाले. त्यातील प्रस्तावित कामांचा १५ लाख ४० हजार रुपयांचा आराखडा पंचायत समिती प्रशासनाने जिल्हा परिषदेला मंजुरीसाठी पाठवला आहे.
जाहिरात :