
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबिर, १८०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुद़ृढ बालक अभियान अशा एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ करण्यात आला. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. मुंबईपाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयात आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखान्याचा शुभारंभ होणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरद़ृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, रोहयो मंत्री संदिपान भुमरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आपल्या सरकारची वाटचाल सुरू आहे. सामान्यांच्या जीवनाशी निगडित असे आरोग्यविषयक विविध उपक्रम आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून राज्यभर हाती घेण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये, नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. या आरोग्य शिबिरांत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होईल. सोबतच त्यांना आवश्यक ते उपचारही मिळतील. याचाही लाभ राज्यभरातील जनतेला होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जाहिरात :
