हवामान: देशातील हवामानत झपाट्याने बदल होताना दिसत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आहे. तर, काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट असणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली आहे. गारठा, दाट धुके यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. यामुळे घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे.
गेल्या चार दिवसांपासून राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. या हिवाळ्याच्या हंगामातील नीचांकी किमान तापमान रविवारी नोंदवण्यात आले. तापमानात आणखी घसरण झाल्याने राष्ट्रीय राजधानीत धुके आणि थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे. दरम्यान, कमी दृश्यमानता आणि प्रदूषण गंभीर श्रेणीत पोहोचले आहे.
सोमवारी सकाळी प्रामुख्याने आकाश निरभ्र आणि दाट ते दाट धुके राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. अंदाजानुसार, 14 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय राजधानीत दाट धुक्यासह थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. वाऱ्याचा वेग वाढल्याने तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिल्ली, गुरुग्राम आणि फरिदाबादसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.