अयोध्या :- अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. अवघे काही दिवस राहिले असल्याने लगबगीला वेग आला आहे. या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्यांना आमंत्रणे पोहोचली आहेत. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टला आतापर्यंत ५५०० कोटी रुपयांचे दान मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये दोन अशा व्यक्ती आहेत, ज्यांनी प्रत्येकी ११ कोटी रुपयांचे दान दिले आहे. हे आतापर्यंतचे विक्रमी दान असल्याचे सांगितले जात आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला राम मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत पाच हजार कोटींहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत. राम मंदिर ट्रस्टने देशातील ११ कोटी लोकांकडून ९०० कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, आत्तापर्यंत राम मंदिरासाठी ५५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त दान मिळाले आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, आतापर्यंत सुमारे १८ कोटी राम भक्तांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी विविध बँक खात्यांमध्ये सुमारे ३२०० कोटींचा समर्पण निधी जमा केला आहे. ट्रस्टने या बँक खात्यांमध्ये जमा केलेल्या निधीची एक एफडी केली होती. या एफडीच्या व्याजातून राम मंदिराचे सध्याचे स्वरूप साकारण्यात आले आहे, असे समजते.
राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी देणाऱ्यांच्या यादीत मोरारी बापू यांचे नाव आघाडीवर आहे. गुजरातमधील मोरारी बापू यांनी राम मंदिरासाठी आजवरची सर्वाधिक देणगी दिली आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार, मोरारी बापूंनी राम मंदिरासाठी ११.३ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर, अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील त्यांच्या अनुयायांनी स्वतंत्रपणे ८ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
दरम्यान, भव्य राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्यांमध्ये मोरारी बापू यांच्यानंतर सर्वाधिक देणगी देणारी दुसरी व्यक्ती म्हणजे गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया. राम मंदिराच्या उभारणीसाठी ढोलकिया यांनी ११ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गोविंदभाई ढोलकिया हे हिरे कंपनी श्रीरामकृष्ण एक्सपोर्ट्सचे मालक आहेत. गोविंदभाई दरवर्षी दिवाळीत आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या तसेच महागड्या भेटवस्तू देतात. सुरतचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया हे वर्षानुवर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.