राजापूर :- बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत कार्यकर्त्यांना मोठे केले. परंतु स्वार्थासाठी, मोहापायी, खुर्चीसाठी बाळासाहेबांची भूमिका आणि त्यांचे विचार बाजूला सारून जे काही घडले ते अघटित आहे. कोकणी माणसाचे बाळासाहेबांशी अतूट नाते आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाची त्यांची बांधिलकी आहे. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला.
शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री राजापूरला आले होते. इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल याचा विचार आम्ही केला. आम्ही मागचा पुढचा विचार न करता जे धाडस केले ते संपूर्ण जगाने पाहिले आहे. आमची भूमिका चुकीची आणि स्वार्थासाठी असती तर जनतेने आमच्याकडे पाठ फिरवली असती. आज इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झाला ही आमच्या कामाची पोचपावती आहे असं त्यांनी सांगितले.
राम मंदिराचा विषय आपण कधीही राजकीय केला नाही. हा श्रद्धेचा, अस्मितेचा आणि भावनेचा विषय आहे. आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होतील हे समजून बोलायला हवे. बाळासाहेब असते तर मोदींना शाबासकी दिली असती. परंतु आज त्यांच्यावर टीका करताय. राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय असं शिंदेंनी म्हटलं.