
सहकारी संस्थांवर गुजरातचा डोळा ;
राज्यातील नेते मिंधे : राज ठाकरे
कर्जत :- महाराष्ट्रातील सहकार चळवळ सांभाळण्याची क्षमता महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये आहे. यापुढेही चळवळ सक्षमपणे चालविली जाईल. पण आताची सहकार चळवळ सहारा चळवळ झाली आहे. मुंबईतील महानंद दूध संघ गुजरातचा अमोल दूध संघ गिळंकृत करेल, अशी भीती व्यक्त करून राज्यातील सहकार संस्थांवर गुजरातचा डोळा आहे, असे सांगून आपल्याकडील नेते मिंध्ये झाले आहेत. नेत्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मनसे कार्यकर्त्यांचे कर्जत येथे आज मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, जमिनीसाठी पहिले आंदोलन ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांनी केले होते. खरी सहकार चळवळ फुलेंनी सुरू केली. महाराष्ट्रातील सहकार चळवळ सांभाळण्याची क्षमता महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये आहे. यापुढेही चळवळ सक्षमपणे चालविण्याची क्षमता पुढील पिढ्यांमध्ये आहे. पण आताची सहकार चळवळ सहारा चळवळ झाली आहे, अशी टीका करून राज्यातील सहकारी संस्थांवर गुजरातचा डोळा आहे. कारण राज्यातील नेते मिंधे झाले असून त्यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला आहे. राज्य सरकारही लाचार झाले आहे. मराठी माणूस चांगला व्यवसाय करू शकतो. परंतु, मराठी माणसांत फूट पाडली जात आहे. सध्या आपण जातीत जाती भांडत बसलो आहे.
महाराष्ट्रात सध्या पाण्याची भीषण स्थिती आहे. पाण्याची उपलब्धता नसताना मराठवाड्यात उसाचे उत्पादन घेतले जात आहे. राजकीय फायद्यासाठी मराठवाड्यात साखर उद्योग उभारला जात आहे. पुढील ४० वर्षात मराठवाड्याचे वाळवंट होईल, अशी भीती ठाकरे यांनी व्यक्त केली.
मोठे रस्ते झाल्याने जागा हातून जात आहेत, जमिनी हातातून गेल्यानंतर काही उरणार नाही. जमिनी गेल्यास रायगडही हातात राहणार नाही. बाहेरच्या राज्यातील लोक येऊन जमिनी घेऊन जातील, अशी भीती व्यक्त करून मराठी माणसांनी आता सजग झाले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.