नवी दिल्ली – 20 डिसेंबर : वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी मंगळवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, देशातील सुमारे २० टक्के प्रधानमंत्री जन धन योजनेची (पीएमजेडीवाय) खाती निष्क्रिय आहेत. ६ डिसेंबरपर्यंत एकूण १०.३४ कोटी निष्क्रिय पीएमजेडीवाय खात्यांपैकी ४.९३ कोटी खाती महिलांची आहेत. बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, अंदाजे ५१.११ कोटी पीएमजेडीवाय खात्यांपैकी सुमारे २० टक्के खाते ६ डिसेंबरपर्यंत निष्क्रिय होते, असे त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले आहे.
निष्क्रिय पीएमजेडीवाय खात्यांची टक्केवारी बँकिंग क्षेत्रातील एकूण निष्क्रिय खात्यांच्या टक्केवारीसारखीच आहे, असे ते म्हणाले. पीएमजेडीवाय खात्यांमध्ये असलेली शिल्लक अंदाजे १२,७७९ कोटी रुपये आहे, जी पीएमजेडीवाय खात्यांमधील एकूण जमा शिल्लकच्या अंदाजे ६.१२ टक्के आहे.
ते म्हणाले की, सक्रिय खात्यांवर लागू होणाऱ्या व्याजाइतकाच व्याज या निष्क्रिय खात्यांना मिळत असून खाते पुन्हा उघडल्यानंतर ठेवीदार कधीही त्यावर दावा आणि पैसे काढू शकतात. बँका निष्क्रिय खात्यांची टक्केवारी कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न करत आहेत आणि सरकारकडून नियमितपणे प्रगतीचे निरीक्षण केले जात आहे.