नवी दिल्ली- संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना घडली आहे. संसदेचे कामकाज चालू असताना दोन घुसघोरांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. खासदार बसलेल्या बाकांवर या अज्ञातांनी उड्या मारल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. संसदेवरील हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण होत असताना ही बाब समोर आली आहे. या अज्ञातांनी उड्या मारल्यानंतर स्मोक कॅण्डल पेटवल्या. या सर्व गोंधळामुळे खासदारांची पळापळ झाली.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण होत असताना संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. प्रेक्षकांसाठीच्या गॅलरीमधून दोन जणांनी लोकसभेत उड्या टाकल्या. आसपास असलेल्या खासदारांनी दोघांना पकडलं. त्यानंतर लोकसभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सदनात जनहिताच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. पश्चिम बंगालचे भाजप खासदार स्वगेन मुर्मू भाषण करतेवेळी दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे खासदारांसह सारेच गोंधळले.
यानंतर पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी कामकाज दुपारी २ पर्यंत स्थगित केलं. लोकसभेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन तरुणांनी तिथून खाली उडी मारली. त्यानंतर ते एका बाकावरुन दुसऱ्या बाकावर उड्या मारत पळत होते. एकानं बूटातून स्प्रे काढला. त्यात पिवळ्या रंगाचा वायू होता. त्यानं स्प्रे मारल्यानंतर सदनात पिवळा धूर पसरला. खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडलं आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब करण्यात आलं.