नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत झालेली भेट अविस्मरणीय- बाळ माने

Spread the love

रत्नागिरी : भारतीय नौदलाच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (ता. ४) रोजी कोकणातल्या, मालवण तालुक्यात राजकोट येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट अविस्मरणीय असल्याचे मत भाजपाचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या अठरापगड जातींना हिंदवी स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शिवछत्रतींची प्रेरणा येणाऱ्या सर्व पिढ्यांना सदैव मिळत राहील, असेही माने यांनी सांगितले.

कार्यक्रम आटपून रत्नागिरीत आलेल्या माने यांनी सांगितले की, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह भाजपा नेते, सिंधुदुर्गचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मी उपस्थित होतो. नौदलाच्या कवायती तारकर्लीच्या किनारी रंगतदार झाल्या. माझ्या जीवनातील हा अत्यंत आनंदाचा क्षण होता.

भारताच्या संरक्षण दलातील नौदलास खूप मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवरायांच्या काळात या संपूर्ण सागरी किनारपट्टीची सुरक्षा करण्यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी तैनात होते, मेहनत घेत होते. राजकोट येथे स्थापित झालेला शिवरायांचा पुतळा कोकणच्या व देशाच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. शिवशाहीचा ज्वलंत इतिहास प्रेरणा देईल. नौदल अधिकाऱ्यांच्या गणवेशावरील नवीन मानचिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा प्रतिबिंबित करतील. भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे माने म्हणाले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ही मुद्रा उमटणे ही मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप प्रेम कोकणावर दिसून आले, असे श्री. माने म्हणाले.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नौदल दिन व मोदींच्या दौऱ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा तर हा बालेकिल्लाच आहे. माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांनीही हा कार्यक्रम होण्याकरिता खूप मोठी मेहनत घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page