लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांचा संगमेश्वर-चिपळूण विधानसभा प्रवासाचा दुसरा टप्पा ६ डिसेंबरपासून.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | कणकवली | डिसेंबर ०३, २०२३.

भाजपा नेते, कणकवली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी नुकताच लोकसभा प्रवास योजनेंतर्गत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा पहिला टप्पा चिपळूण तालुका व चिपळूण शहर असा पूर्ण केला असून दि. ६ डिसेंबर रोजी संगमेश्वर (दक्षिण) व संगमेश्वर (उत्तर) तालुका तसेच संगमेश्वर (शहर) असा दुसऱ्या टप्प्याचा प्रवास सुरु होणार आहे. हा प्रवास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांच्या नेतृत्त्वाखाली संपन्न होणार आहे.

या प्रवासादरम्यान संगमेश्वर तालुक्यातील राजकीय परिस्थितीचे अवलोकन करण्यावर प्रमोद जठार यांचा भर राहणार असून बूथ सक्षम करणे व महाविजय २०२४ अंतर्गत प्रत्येक बूथवर भाजपासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करून ५१% पेक्षा जास्त मतदान भाजपाला मिळवण्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा करणे असे प्रमुख विषय राहणार आहेत. गावभेटी, लाभार्थी भेटी, विकासकामांचा आढावा घेणे, गावातील धार्मिक स्थळांना भेटी देणे, महिला बचत गट, सांस्कृतिक मंडळांच्या सदस्यांना भेटी देणे, ‘घर चलो अभियान’ राबवणे इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत.

याबद्दल अधिक माहिती देताना लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार म्हणाले, “राष्ट्रगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदीजी भारतीय नौदलाच्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सिंधुदुर्ग येथे येणार असल्याने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रवास दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने ४ पैकी ३ राज्यांत भाजपावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून तीनही ठिकाणी पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होत आहे. यामुळे संगमेश्वर तालुक्यात होणारा प्रवास सकारात्मक परिणाम देणार ठरेल याची मला निश्चिती आहे. तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते घेत असलेली मेहनत कौतुकास्पद असून त्यांना या प्रवासाच्या माध्यमातून नवी उमेद मिळेल अशी आशा आहे.”

संगमेश्वर (उत्तर) तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, संगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्ष रुपेश कदम, जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, बूथ सक्षमीकरण अभियान संयोजक अनिल घोसाळकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. शीतल दिंडे व सौ. स्नेहा फाटक, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये, भाजयुमो अध्यक्ष स्वप्नील सुर्वे व प्रथमेश धामणस्कर, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौ. श्रद्धा इंदुलकर यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रवासात सहभागी होणार आहेत.

Author


Spread the love

You cannot copy content of this page