“आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार.”- पालकमंत्री उदय सामंत.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | फेब्रुवारी ०७, २०२३.

आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.

आंबा उत्पादकांना हमीभाव देण्याबरोबरच विविध मागण्या या बोर्डाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी समिती नेमून या समितीवर दोन बागायतदार प्रतिनिधी नेमण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला आमदार योगेश कदम, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव नितिन करीर, प्रधान सचिव पराग जैन, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, आंबा बागायतदार संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष भूषण बरे आदी पदाधिकारी, नाम फाऊंडेशनचे मंदार पाटेकर, चिपळूण बचाव समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आंबा व काजू बागायतदार नुकसानग्रस्तांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यासंबंधी व कर्जदारांचे कर्ज पुनर्गठीत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित अधिकारी यांची 6 फेब्रुवारी रोजी तातडीची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांची शेतकऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील 22 हजार शेतकऱ्यांना 84 कोटी रुपयांचा पीक विम्याचा मोबदला देण्यात आला आहे. याबाबत खातरजमा करुन उर्वरित वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मोबदला देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेवून प्रश्न सोडवावा. तसेच ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला मिळाला त्यांची यादी जाहीर करण्याचे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी दिले.

आंबा बागायतदारांना पेट्रोल, रॉकेल, खते, कीटकनाशके आणि औषधांच्या निर्धारित किमतीसंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. रत्नागिरीत सुसज्ज प्रयोगशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करुन प्रयोगशाळा सुरु करण्यात येईल. फळमाशी व माकड अशा वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेती नुकसानीबाबत राज्य शासनाने समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचा जिल्हा दौरा होणार असून या समितीने सूचविलेल्या उपाययोजनांवर कार्यवाही करण्यात येईल. शेतीसाठी वापरात असलेल्या कृषीपंपांना चुकीची वीज बिले आकारली जात असल्याबाबतच्या समस्येची माहिती घेवून जिल्हाधिकारी यांनी प्रश्न सोडवावा, असे निर्देशही मंत्री उदय सामंत यांनी दिले.

कोकणातील कुळवहिवाटदारांची प्रकरणे व दावे तसेच पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या घरांच्या जमीन मालकी हक्कासंबंधी गावनिहाय प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन मोहीम राबवावी. रायगड जिल्ह्यातील कुणबी समाज बांधवांना जातीचे दाखले देण्यासंबंधी जिल्हास्तरीय समिती स्थापन करुन निर्णय घेतला जाईल. तसेच सारथी मध्ये तिल्लोरी – कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबतही विचार केला जाईल.

रत्नागिरीमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘लोकनेते शामरावजी पेजे अभियांत्रिकी विद्यालय’ असे नाव देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल. तसेच लोकनेते शामरावजी पेजे आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबीबहुल तालुक्यांमध्ये सांस्कृतिक कुणबी भवन उभारण्यासाठी योजना राबविण्यात येईल, असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम तत्काळ सुरू करावे. वाशिष्ठी नदीतील गाळाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पहिल्या टप्प्यातील शिल्लक रक्कमेतून सध्या गाळ काढण्याचे काम करावे तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना निधीतून 50 लाख रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page