सातारा : अमित आबासाहेब भोसले यांच्यावर अज्ञातांनी मोपेडे मोटार सायकलवर येऊन गोळीबार करून त्यांचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच संशयित आरोपींना गोवा येथे अटक केली. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी अमित याच्या पत्नीकडूनच सुपारी घेवून खून केल्याचे तपासात सांगितले. मृताची पत्नी व बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने तिचा मृत पती हा बाहेरील स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवून तिला मारहाण करीत होता असे पत्नीचे म्हणणे आहे. त्यालाच कंटाळून पत्नीने आपल्या पतीच्या खुनाची सुपारी दिली होती असे तपासात निष्पन्न झाले आहे.
वाढे गावच्या हद्दीत पुणे-कोल्हापूर रोडवर सर्व्हिस रोड अमित आबासाहेब भोसले (रा. शुक्रवारपेठ,सातारा) यांचेवर अज्ञातांनी मोपेडे मोटार सायकलवर येऊन गोळीबार करून त्यांचा खून केल्याची घटना २४ जानेवारी रोजी घडली होती. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. हा खून उघडकीस आणण्यास पोलिसांना दहा दिवसात यश आले. अभिषेक विलास चतुर (वय २७ वर्षे रा. नांदगिरी ता. कोरेगाव जि. सातारा), शुभम हिंदुराव चतुर (वय २७ वर्षे रा. कोरेगाव सध्या पुणे), राजू भिमराव पवार (वय २६ वर्ये रा. १० पंताचा गोट ता. जि. सातारा), सचिन रमेश चव्हाण (वय २२ वर्षे रा. मुळशी पुणे), सूरज ज्ञानेश्वर कदम (वय २७ वर्षे, खेड ता. जि. सातारा) सध्या पुणे अशी संशयित आरोपींची नावे आहेत.या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा मोहन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन या गुन्हयातील संशयित आरोपींना पकडले आणि गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गजें, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे व व पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी सातारा तालुका पोलीस ठाणेकडील तपास पथक तयार केले.