
गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळून आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी/जनशक्तीचा दबाव- गेल्या दोन दिवसांपासून ग्रामस्थांसह प्रशासनाकडून या माशाचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अखेर अपयश आलं आहे.
बुधवारी रात्री व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ ग्रामस्थांना व्हेल माशाचं पिल्लू बेशुद्ध अवस्थेत आढळून आलं होतं. या पिल्लाची प्रकृती खालावलेली होती.
ग्रामस्थानी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाकडून या व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी कसरत सुरू होती. कापडामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता.
भरती सुरू झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या माशाला जेसीबीच्या सहाय्याने समुद्रात सोडण्यात आले होते. मात्र, बुधवारी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले.
२० फुटांहून अधिक लांब आणि ५ ते ६ टन इतके या माशाच्या पिल्लाचे वजन होते. पर्यटक, स्थानिक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे.