दिवाळीच्या पूर्वसंध्येला अयोध्येत होणाऱ्या दीपोत्सवाची चर्चा जगभरात असते. शनिवारी अयोध्येत २२.२३ लाख दिवे प्रज्वलित करुन नवा गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित केला गेला.
नवी दिल्ली Ayodhya Deepotsav : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अयोध्येतील दीपोत्सवाची काही छायाचित्र ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. पंतप्रधानांनी दीपोत्सवाला, ‘आश्चर्यकारक, दिव्य आणि अविस्मरणीय’ म्हटलं आहे. अयोध्येत प्रज्वलित केलेल्या लाखो दिव्यांनी संपूर्ण देश प्रकाशित झाला, असं ते म्हणाले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी :
“दीपोत्सवातून निर्माण होणारी ऊर्जा देशभरात नवा उत्साह आणि उत्साह पसरवत आहे. प्रभू श्री राम सर्व देशवासीयांचं भले करोत. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी ते प्रेरणास्थान बनतील अशी माझी इच्छा आहे. जय सिया राम”, असं पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद :
शनिवारी (११ नोव्हेंबर) अयोध्येत ‘दीपोत्सव २०२३’ दरम्यान २२.२३ लाख दिवे प्रज्वलित करुन नवा गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित केला गेला. अयोध्येनं गेल्या वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला १५.७६ लाख दिवे प्रज्वलित करण्याचा आपलाच जागतिक विक्रम मोडला. उत्तर प्रदेश सरकारच्या या ग्रँड दीपोत्सवला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनंही मान्यता दिली आहे.
दरवर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर दरवर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यंदाही त्यांनी ही परंपरा कायम राखली. यावर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी ते हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे पोहोचले. यावेळी त्यांनी सैनिकांना संबोधित केलं. जोपर्यंत शूर सैनिक सीमेवर उभे आहेत तोपर्यंत भारत सुरक्षित आहे. त्यामुळेच दिवाळीचा दिवा तुमच्या सुरक्षेसाठी आहे. देशाचे नागरिक आपल्या प्रत्येक प्रार्थनेत तुमच्या सुरक्षिततेची इच्छा करतात, असं मोदी म्हणाले.