गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते शनिवारी नागपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने येत असतांना विहिरगांवजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात गाडीचे थोडे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. आपण सुखरूप असल्याचे खा.अशोक नेते यांनी सांगितले.
खा.नेते मुंबईवरून रात्री १२.१५ च्या सुमारास नागपूरला पोहोचल्यानंतर सकाळी ते आपल्या वाहनाने (एमएच ३३, एए ९९९०) गडचिरोलीकडे निघाले होते. सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील विहिरगांवजवळ समोरच्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खा.नेते यांच्या वाहनचालकाने गाडीवरील नियंत्रण सुटू न देता तातडीने ब्रेक लावले. पण त्या प्रयत्नात ट्रकच्या एका कॅार्नरला मागून हलकीशी धडक बसली. त्यात खा.नेते यांच्या वाहनाचे थोडे नुकसान झाले. मात्र नेते यांच्यासह त्यांच्या वाहनातील कोणालाही इजा झाली नाही,
यानंतर दुसऱ्या वाहनाने खा.नेते गडचिरोलीकडे निघाले. गडचिरोलीत पोहोचल्यानंतर ते आपल्या मतदार संघातील नियोजित दौऱ्यासाठीही रवाना झाले. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी खा.नेते यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ईश्वरी कृपेने कोणालाही दुखापत झालेली नाही, असे खा.नेते यांनी सांगितले.
लोकसभा क्षेत्रातील जनतेचे प्रेम व आपुलकी जिव्हाळा सदैव माझ्या पाठीशी आहेच.जनतेनी दिलेल प्रेम माझ्या हृदयात असून आपुलकीची भावना मी या प्रसंगी व्यक्त करतो.