ठाणे: ठाण्यातील मुंब्रा परिसरात शिवसेना शाखा वरून पुन्हा एकदा राडा झाला असून शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले. ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शाखा शिंदे गटाने मिळवली आणि त्यावर बुल-डोझर चालवून ती उद्ध्वस्त केली आणि त्या ठिकाणी नवीन इमारत उभी करणार असल्याचं स्पष्ट केलं. यामुळे आता शिवसेनेच्या दोन्ही गटातील वाद पुन्हा एकदा शिगेला पोहचणार.
ठाणे शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना शाखेचा वाद पेटता आहे. ठाणे शहरात अनेकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं दिसून आलंय. आता ठाण्यातील मुंब्रा परिसरात देखील शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे. मुंब्रा येथील मध्यवर्ती शहर शाखे वरून वाद झाला असून या शाखेवर सध्या शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे.
आनंद दिघे यांच्या काळात ही शाखा रस्ता रुंदीकरण झाल्याने या ठिकाणी आमच्या सहकार्याने बनवली होती. मात्र आता याची दुरवस्था झालेली आम्हाला बघवली नाही. वर्षातून काहीच दिवस शाखा उघडण्यात येत होती. त्यामुळे ही शाखा धूळ खात पडली होती. मात्र शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी घोषित झाल्याने आम्ही आमच्या हक्काच्या शाखेत प्रवेश केला असल्याचं शिंदे गटाचे राजन किणे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान उद्धव गटाकडून मुंब्रा शहर मध्यवर्ती शाखा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शिंदे गटाने शाखे वरून रात्री उशिरा बुलडोझर फिरवून शाखा केली पूर्णपणे उद्ध्वस्त केली. जुनी दुरवस्था झालेली शाखा पाडून आता त्या ठिकाणी नव्या पद्धतीने शिंदे गटाची शिवसेना शाखा बांधून स्थापन करण्यात येणार असल्याचे शिंदे गटाचे समर्थक माजी नगरसेवक राजन किणे यांनी सांगितलं.