जनशक्तीचा दबाव, प्रतिनिधी-
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्यांना सलग चौथ्या सामन्यात हार पत्करावी लागली. शुक्रवारी (दि.२८) पाकिस्तान संघाने अखेरच्या क्षणापर्यंत दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली.
पण, केशव महाराजने चौकार मारून एका विकेटने आफ्रिकेला थरारक विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा हिरो ठरलेल्या केशव महाराजचे भारतासोबत खास नातं आहे. हनुमानाचा सच्चा भक्त असलेल्या आणि बॅटवर ‘ओम’ लिहिणाऱ्या केशवबद्दल जाणून घेऊया…
भारतात सध्या विश्वचषक २०२३ चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकातील सर्वात रोमांचक सामना रंगला.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आफ्रिकेने शेवटच्या क्षणी १ गडी राखून सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने पाकिस्तानविरुद्ध २१ चेंडूत ७ धावांची नाबाद खेळी केली असली तरी या विजयाचा खरा हिरो म्हणून त्यांची वर्णी लागली.
याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज बाद झाले तेव्हा केशव एकटाच मैदानात होता. पाकिस्तानने अखेरच्या क्षणापर्यंत दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली. एडन मार्करामच्या (९१) विकेटनंतर सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकला होता आणि चाहत्यांची धडधड वाढली होती. त्यात हॅरिस रौफने आफ्रिकेला नववा धक्का दिला आणि सर्वांचे टेन्शन वाढले. पण, केशव महाराजने अखेरच्या क्षणी विजयाचा चौकार मारला.
कोण आहे केशव महाराज?
३३ वर्षीय केशव महाराज हा भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. तो चांगली फलंदाजीही करतो. केशवचे पूर्वज उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे रहिवासी होते. सुलतानपूरशी त्यांचा घट्ट संबंध होता. केशवचे वडील आत्मानंद महाराज यांनी ही माहिती एका मुलाखतीत दिली होती. आत्मानंद महाराज यांनी सांगितले की, त्यांचे पूर्वज १८७४ च्या सुमारास सुलतानपूर सोडून नोकरी निमित्त दक्षिण आफ्रिकेत आले.
केशव हनुमानाचा भक्त
केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेत राहूनही आपल्या हिंदू प्रथा सोडलेल्या नाहीत. तो पूर्णपणे हिंदू धर्माचे पालन करतो. तो हिंदू देवदेवतांची पूजाही करतो. इतकंच नाही तर जेव्हा जेव्हा त्याला भारतात येण्याची संधी मिळते तेव्हा तो इथे येऊन मंदिरात जातो. केशव हा हनुमानाचा सच्चा भक्त आहे.
बॅटवर लिहितो ‘ओम’
केशव महाराजच्या बॅटवर ओम लिहिलेले आहे. त्याच्या बॅटवर ओमचे स्टिकर अनेकदा दिसून येते. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ४९ कसोटी, ३६ एकदिवसीय आणि २६ टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत १५८, एकदिवसीयमध्ये ४४ आणि टी-२० मध्ये २२ विकेट आहेत. तर त्याने कसोटीत ११२९ धावा, एकदिवसीय सामन्यात २०२ धावा आणि टी २० मध्ये ७८ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही एकूण ५ अर्धशतके झळकावली आहेत.