
विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी पथ संचलन केलं. यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांनी भारतानं चंद्रयान मोहिमेत मिळविलेलं यश, जी-२० परिषद, अयोध्या मंदिर अशा विविध विषयांवर मत व्यक्त केलं.







शोषण आणि एकाधिकारशाहीला मोकळे मैदान मिळत आहे
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे संघाच्या पांरपारिक वेषात उपस्थित होते. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे संस्थापक हेडगेवार यांना विजयादशमी उत्सव कार्यक्रमात श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गायक-संगीतकार शंकर महादेवन होते.
मोहन भागवत म्हणाले, चंद्रयानच्या बाबतीत उदयोन्मुख भारताची शक्ती, बुद्धिमत्ता आणि रणनीतीची झलक जगाला दिसली. नेतृत्वाच्या इच्छाशक्तीला आपल्या शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक ज्ञान आणि तांत्रिक कौशल्याची जोड दिली गेली. अंतराळ युगाच्या इतिहासात प्रथमच भारताचे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. ही बाब तमाम भारतीयांचा अभिमान आणि आत्मविश्वास वाढवणारी असल्याचं सरसंघचालक भागवत यांनी म्हटलं.
22 जानेवारी श्रीराम लल्लाचा अभिषेक
श्रीराम लल्ला यांचा अभिषेक22 जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहात करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. श्री राम हे आपल्या देशाच्या आचरणाचे प्रतिक, कर्तव्य बजावण्याचे प्रतीक, स्नेह आणि करुणेचे प्रतीक आहेत. राम मंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशानं प्रत्येक हृदयात मनाचा राम जागृत होऊन मनाची अयोध्या सजते आणि सर्वत्र आपुलकीचे, प्रयत्नाचे आणि सद्भावनेचे वातावरण निर्माण होते, अशी भावना सरसंघचालकांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष
आपल्या जीवनातून अहिंसा, दया आणि नैतिकतेचा मार्ग अवघ्या जगाला देणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आहे. ‘सत्यार्थ प्रकाश’ च्या माध्यमातून संपूर्ण देशातील जनतेला त्यांच्या ‘स्व’चे स्पष्ट दर्शन देणारे महर्षी दयानंद सरस्वती यांची 200 वी जयंती आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या राणी दुर्गावतीची ही 500 वी जयंती आहे. भारतीय महिलांच्या अष्टपैलू बांधिलकी, नेतृत्व क्षमता, तेजस्वी नम्रता आणि देशभक्तीचे त्या एक ज्वलंत उदाहरण आहेत. आपल्या परोपकारी आणि प्रशासकीय कौशल्यानं सामाजिक विषमता मुळापासून नष्ट करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या कोल्हापूरचे राज्यकर्ते छत्रपती शाहूजी महाराज यांची ही 150 वी जयंती आहे.शाश्वत मूल्यांच्या आणि परंपरांच्या आधारे नवा मार्ग दाखवावा -धार्मिक पंथांतून निर्माण होणारा धर्मांधपणा, अहंकार आणि उन्माद यांचा जगाला सामना करावा लागत आहे. युक्रेनमधील युद्ध, स्वार्थी हितसंबंध आणि अतिरेकी यांच्या संघर्षामुळे उद्भवलेल्या गाझा पट्टीसारख्या संघर्षांवर कोणताही उपाय नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. पुढे भागवत म्हणाले, निसर्गाच्या विरुद्ध जीवनशैली, स्वार्थ आणि अनिर्बंध उपभोग यामुळे नवनवीन शारीरिक व मानसिक मर्यादा निर्माण होत आहेत. तसंच विकार आणि गुन्हे वाढत आहेत. अमर्याद शोषणामुळे, प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, असमतोल आणि परिणामी नैसर्गिक आपत्ती दरवर्षी वाढत आहेत. दहशतवाद, शोषण आणि एकाधिकारशाहीला मोकळे मैदान मिळत आहे. जग आपल्या अपूर्ण दृष्टीने या समस्यांना तोंड देऊ शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारताने आपल्या शाश्वत मूल्यांच्या आणि परंपरांच्या आधारे जगाला आपल्या उदाहरणाद्वारे खऱ्या आनंदाचा आणि शांतीचा नवा मार्ग दाखवावा अशी अपेक्षा आहे.
मणिपूरमध्ये परस्पर कलह अचानक कसा उफाळून आला?
देशात राजकीय स्वार्थापोटी राजकीय प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी अशा अनिष्ट शक्तींशी युती करण्यात अविवेकीपणा आहे. समाज आधीच विविध प्रकारच्या फाळणींनी ग्रासलेला आणि स्वार्थ, मत्सर तसंच द्वेषाच्या जीवघेण्या स्पर्धेत अडकलेला आहे. त्यामुळेच या राक्षसी शक्तींना समाज किंवा राष्ट्र तोडू पाहणाऱ्या अंतर्गत किंवा बाह्य शक्तींचाही पाठिंबा मिळतो. मणिपूरची सद्यस्थिती पाहिली तर ही गोष्ट लक्षात येते. जवळपास दशकभर शांतता प्रस्थापित असलेल्या मणिपूरमध्ये हा परस्पर कलह अचानक कसा उफाळून आला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का? मणिपुरी मैतेई समाज आणि कुकी समाज यांच्यातील या परस्पर संघर्षाला जातीय स्वरुप देण्याचा प्रयत्न का आणि कोणाकडून झाला?स्वयंसेवकांचा आम्हाला अभिमान -संघाचे स्वयंसेवक सातत्याने सर्वांची सेवा करत आहेत. सामाजिक स्तरावर मदतकार्य करत आहेत. प्रत्येकाला आपले म्हणून स्वीकारून, सर्व प्रकारची किंमत चुकवून समजून घेऊन सर्वांना सुरक्षित, संघटित, एकोपा आणि शांततापूर्ण ठेवण्याचा संघाचा प्रयत्न आहे. या भयंकर आणि त्रासदायक परिस्थितीतही आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे सर्वांची शांत मनाने काळजी घेण्याचा प्रयत्न केला, त्या स्वयंसेवकांचा आम्हाला अभिमान असल्याचं सरसंघचालकांनी म्हटलं.
शंकर महादेवन यांच्याकडून आभार व्यक्त .
दरवर्षीप्रमाणं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी विजयादशमीनिमित्त आज पथ संचलन केलं. विजयदशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं.
पथसंचलनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि गायक शंकर महादेवन सहभागी झाले. गायक शंकर महादेवन म्हणाले, विजयादशमीच्या निमित्तानं सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माझं स्वागत झालं. हा माझ्यासाठी खूप सन्मान आहे. त्यासाठी मी आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि संपूर्ण संघ परिवाराचे आभार मानू इच्छितो, असं शंकर महादेवन यांनी म्हटलं.