मुंबई :– दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूशी निगडीत एका प्रकरणात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी केली. त्यात आता आदित्य ठाकरेंनी मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी उच्च न्यायालयात परवानगी मागितली आहे. जेणेकरून या प्रकरणी कुठलाही आदेश पारित करण्याअगोदर आदित्य ठाकरेंचे म्हणणं कोर्टाकडून ऐकले जाईल. वकील राहुल अरोटे यांच्या माध्यमातून केलेल्या या कॅव्हेटमध्ये आदित्य ठाकरेंनी म्हटलंय की, ही जनहित याचिका विचारात घेण्यासारखी नाही. कारण सुशांत राजपूत प्रकरणाचा तपास याआधीच केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय करत आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण असल्याने हायकोर्ट कुठलाही आदेश पारित करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी सुनावणी करताना आपली बाजू कोर्टाने ऐकावी अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.
काय आहे याचिका ?
दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे ८ जून २०२० रोजी मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण हे सगळे १०० मीटरच्या परिसरात एकत्र होते. १३-१४ जून २०२० रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणं झाले याची चौकशी व्हावी. सुशांत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.