जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०४,२०२३.
रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला.
राज्यशास्त्र विभागातील प्रा. निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची पार्श्वभूमी, तो साजरा करण्याचा प्रमुख उद्देश, निवडणूक प्रक्रिया इ. ची माहिती सांगून राष्ट्रीय मतदार दिनी शपथ दिली. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, सशक्त, सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी मतदानाच्या टक्केवारी वाढीबरोबरच उमेदवार निवड गुणवत्ताही वाढली पाहिजे, असे मत त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित राहिले.
या कार्यक्रमात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. निलेश पाटील यांचा मतदार नोंदणी, जनजागृती कार्यक्रम महाविद्यालयात उत्तमरीत्या राबविल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.