चिपळूण :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या मध्यवर्ती भागातील दोन गर्डर आज सकाळी खचले. यावेळी जोरदार आवाज झाला.
गेल्या महिनाभरात चिपळूण हद्दीत कामाचा वेग वाढला होता. विशेषतः शहरातील बहाद्दूरशेख नाक्यातील उड्डाण पुलाच्या कामाला चांगली गती मिळाली होती. सुरुवातीला शहरातून जाणारा १.८५ किलोमीटर अंतराचा हा उड्डाण पूल उभारताना अनेक अडचणींना सामना करावा लागला. या पुलांतर्गत एकूण ४६ पिलर उभारल्यानंतर तात्काळ गर्डर चढविण्याचे काम सुरू केले आहे. वाशिष्ठी पुलापासून बहादूरशेख नाका दरम्यानचे गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर नुकतेच अतिशय मुख्य नाक्यातील अवघड टप्प्यात काम सुरु केले होते.
उड्डाण पुलाचे काम वाशिष्ठी पुलाच्या बाजूने सुरु केले आहे. एकूण ४६ पिलर असताना त्यातील सहाव्या पिलर पर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. अशातच आज सोमवारी सकाळी पाचव्या पिलरच्या ठिकाणी असलेले गर्डर खचले. त्यामुळे परिसरात जोरदार आवाजही झाला. यावेळी नागरिकांची पळापळ झाली. पुलालगत असलेल्या इमारतीतील व्यापारी व रहिवाशांचीही धावाधाव झाली. या पुलाच्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांनीही तेथुन पळ काढला. तूर्तास या पुलाचे काम थांबविण्यात आले आहे.