ठाणे : निलेश घाग दिव्यातील विविध रखडलेल्या विकासकामांच्या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी वेळोवेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी झालेल्या चर्चेत आयुक्तांनी दिव्याचा दौरा करून रखडलेल्या विकासकामांचा पाहणी दौरा करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार आज अभिजित बांगर यांनी दिवा शहराचा दौरा केला.
या दौऱ्यात आमदार राजू पाटील यांनी दिवा स्टेशन परिसरातील रखडलेले उड्डाणपुलाचे काम, जलवाहिन्यांच्या रिमॉडेलिंग चा रखडलेला प्रश्न, दिवा स्टेशन परिसरात बस्तान मांडून असणारे फेरीवाले, येवले चहा समोर दिवा चौकातील असणाऱ्या चौकामुळे होणारी वाहतूक कोंडी, दिवा पश्चिमेकडील नवीन तिकीट घर ते श्लोक नगर २ पर्यंतचा रखडलेला रस्ता, पाण्याच्या टाक्या बनविण्यासाठी आरक्षित असलेले भूखंड अशा विविध विषयांवर महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले. महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रखडलेली सर्व कामे येत्या काही महिन्यात मार्गी लावावीत असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील, शहर सचिव प्रशांत गावडे,उपशहर अध्यक्ष मोतीराम दळवी, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, देवेंद्र भगत, शरद पाटील, मनविसे विभाग अध्यक्ष कुशाल पाटील, मनसेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
जाहिरात