पाटणा- बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपुर जंक्शन येथे नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेनचे २१ डबे रुळावरून घसरले. अतिशय भीषण स्वरुपाच्या या अपघातामध्ये आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १०० प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. काल बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं.
ट्रेन बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आली असता, दानापूर विभागातील रघुनाथपूर स्टेशनजवळ दोन एसी डब्यांसह २१ डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या दुर्घटनेत आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी दु:ख व्यक्त केलं असून घटनेसंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मी केदारनाथला प्रार्थना करतो की सर्व प्रवासी सुरक्षित असावेत. मदतकार्य सुरू झाले आहे. वैद्यकीय पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अपघातग्रस्त मदत वैद्यकीय व्हॅन अपघातस्थळी पोहोचलं आहे, असं ट्वीट मंत्री अश्विनी चौबे यांनी केलं आहे.
दरम्यान, रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बक्सरहून निघाल्यानंतर ही रेल्वे आपल्या गतीनं पुढे जात होती. पण, रघुनाथपूर रेल्वे स्थानकानजीक पास पॉईंट बदलल्यानंतर एक मोठा झटका लागला आणि रेल्वेचा अपघात झाला.
सदरील दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत, रेल्वे अपघाताच्या मूळ कारणाचा शोध घेतला जाईल असं सूचक विधान केलं.
तिथं या अपघातानंतर रेल्वे विभागाकडून बदनापूर, पटना आणि आरा येथे हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.