मुंबई :– तुम्ही कोणता विचार महाराष्ट्र आणि देशाला देणार ? , शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक वेगळे महत्त्व आहे. गद्दारी आणि बेईमानी हा अंगार नाही तर भंगार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी स्वत:चा पक्ष काढावा आणि जनतेसमोर जावे, मग अंगार कोण आणि भंगार कोण यातील फरक तुम्हाला कळेल. कोण अंगार आणि भंगार हे येणारा काळ ठरवेल अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, तुमच्या गळ्यात पट्टा बांधलेला आहे. दादा भुसे यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले, २०० कोटी मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण आहे, त्यावर माझ्यावर मानहानीचा खटला दाखल केलाय, त्याला आम्ही सामोर जावू. पण त्याहून अधिक गंभीर म्हणजे ड्रग्समाफियाला ससून रुग्णालयात दाखल करून त्यांची काळजी घेतली. पुरावे असल्याशिवाय नाना पटोले, सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकर बोलणार नाहीत. ललित पाटील याला ड्रग्समाफिया म्हणून अटक झाली. त्याला पळून जायला सरकारमधील मंत्र्याने मदत केली, त्या मंत्र्याचे नाव जाहीर केले आहे. त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आजही तो ड्रग्स माफिया फरार आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्सचा कारखाना चालू शकत नाही. ड्रग्सच्या पैशातून फार मोठी आर्थिक मदत दादा भुसेंना मिळत होती. या सर्व प्रकाराची चौकशी एकनाथ शिंदे विशेषत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच महाराष्ट्रात ड्रग्समाफियांना संरक्षण राज्याचा मंत्री देतोय, ते दादा भुसे यांची दादागिरी तुम्ही कधी मोडून काढणार आहात की केवळ राजकीय विरोधांसाठी ईडी, सीबीआय आणि पोलिस कारवाया करणार ? दादा भुसे यांचा ललित पाटील प्रकरणातील संबंध काय ? दादा भुसे आणि शिंदे गटाला किती कोटी मिळाले आणि त्याबदल्यात काय संरक्षण मिळाले हा महाराष्ट्राचा सवाल आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी याची चौकशी करावी. मी याबाबत पत्र लिहणार आहे. राज्यातील पोलीस सरकारची हमाली करणार आहे का? एक मंत्री ड्रग्समाफियाला मदत करतोय, त्याला पळून जाण्यास मदत करतोय तुम्ही महाराष्ट्राचा उडता पंजाब करणार आहे का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, भाजपाला पैसा कोण देतंय ? कुणाकडून येतंय ? इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसे खर्च करतंय ते कुणाचे आहे. विरोधी पक्षाने पैसे खर्च केले तर ईडी, सीबीआय येते. भाजपाच्या मुख्यालयात नोटा छापण्याची मशिन आहे इतका खर्च केला जातोय असा निशाणाही संजय राऊतांनी भाजपावर लगावला.