११ ऑक्टोबर/तेलअविव : इस्रायल- हमासच्या युद्धाने आता उग्र रूप घेतले आहे. इस्रायलने हमासचा पूर्णपणे नायनाट करण्याचाच चंग बांधून आपले हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायलच्या सैन्याने घोषणा केली आहे की, त्यांनी गाझाच्या सीमेवर कब्जा मिळवला आहे.
दरम्यान, इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी म्हटले आहे की, हमासचा अर्थमंत्री जवाद अबू शामला हा इस्रायलच्या हवाई दलाच्या हल्ल्यात ठार झाला आहे. तसेच हमासचा आणखी एक म्होरक्या झकारिया अबू मामर हा सुद्धा या हल्ल्यात ठार झाला आहे.
इस्रायलने युद्ध सुरू झाल्यापासून गाझाच्या 1707 ठिकाणांना लक्ष्य बनवले आहे. यामध्ये सुमारे 475 रॉकेट सेंटर्स, 23 स्ट्रॅटेजिक साईटस् आणि 22 जमिनीखालील ठिकाणांचा समावेश आहे. सोमवारीही रात्रभर गाझाच्या दोनशे ठिकाणांना लक्ष्य बनवून तीव्र मारा करण्यात आला. ‘हमास’च्या 1500 दहशतवाद्यांचा आतापर्यंत खात्मा करण्यात आला आहे.
दरम्यान, युद्धाच्या चौथ्या दिवशी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली.
मोदी यांनी ट्विट करून या फोन कॉलबद्दल नेतान्याहू यांचे आभार मानले आणि भारत या संकटाच्या काळात इस्रायलबरोबर भक्कमपणे उभा असल्याचे म्हटले.