६ ऑक्टोबर/ चिपळूण– शासनाची प्रत्येक योजना कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचवण्यासाठी तळागाळात जाऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ नोंदणी मोठ्या प्रमाणात आपल्याला कशाप्रकारे करता येईल याविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आगामी निवडणुका भाजपा कार्यकर्त्याला लढवायची असून ती जिंकायची आहे असा निर्धार करुन आपण आजपासून कामाला लागले पाहिजे, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. भाजपाच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी नियुक्ती केल्यावर पहिली पदाधिकारी बैठक चिपळूणला ब्राम्हण सहाय्यक संघात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते.
यावेळी माजी आमदार व लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, माजी आमदार विनय नातू, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे उपस्थित होते.
माजी आमदार प्रमोद जठार यांनी लोकसभा प्रवास योजनेंतर्गत कार्यकर्त्यांनी करावयाच्या कामांची विस्तृतपणे माहिती सांगितली तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगामी कोकण दौऱ्यातील कार्यक्रमाबाबत उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर माजी आमदार व उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीबाबत तांत्रिक माहितीही त्यांनी दिली आणि जास्तीत जास्त नोंदणी करून घेण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले.
कोकण विभागीय संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी पक्षासाठी दायित्व हे कशा प्रकारचे असले पाहिजे तसेच संघटना वाढीसाठी काय करावे, उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गुहागर, चिपळूण तसेच खेडमधील काही कार्यकर्ते व युवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने शृंगारतळी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेश पवार तसेच पांगरीतर्फे वेळंबचे सरपंच विष्णू वीर, कापसाळचे ऋषिकेश साळवी या युवा पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वात अनेक युवक, खेडमधील वरची हुंबरी गावातील अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थांनी तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.
यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस नीलम गोंधळी, श्रीराम इदाते, विश्वदास लोखंडे, विठ्ठल भालेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल गोंदकर, चिपळूण ग्रामीण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, अजित थरवळ, चिपळूण शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, खेड दक्षिण तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, खेड उत्तर तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दापोली तालुका अध्यक्ष संजय सावंत, मंडणगड तालुकाध्यक्ष आप्पा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे यांनी केले.