ठाणे: डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागातील लक्ष्मण पावशे हि धोकादायक इमारत मंगळवारी संध्याकाळी अचानक कोसळली. दुमजली असलेल्या या इमारतीत सहा कुटुंब राहत होती. इमारत कोसळण्याचे संकेत मिळताच रहिवासी तातडीने घराबाहेर पडले. त्यामुळे जीवित हानी टळली.
चाळीस वर्षापूर्वी लोडबेअरींग पध्दतीने बांधलेल्या या इमारतीत नऊ सदनिका आहेत. सहा घरांमध्ये रहिवासी राहत होते. घराचे काँक्रीट हळूहळू पडत असल्याचे दिसताच रहिवासी तात्काळ ओरडा करत घराबाहेर पडले. त्यानंतर काही क्षणात इमारत कोसळली.
कोपर गावातील नवीन बावडी भागातील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या इमारतीच्या भागातून मंगळवारी संध्याकाळी पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असते. सुदैवाने इमारत कोसळण्याच्या कालावधीत तिथे कोणी नव्हते. रहिवाशी इमारतीमधून बाहेर पडल्यानंतर काही क्षणात इमारतीचा एक भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. इमारतीचा धुरळा काही वेळ परिसरात पसरला होता. इमारत कोसळताच या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या पादचारी, वाहन चालकांची पळापळ झाली.
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा कर्पे सहकारी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षेचा उपाय म्हणून काही वेळ या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, वाहतूक पोलीस, पोलीस दाखल झाले. रात्रीत या इमारतीचा ढिगारा बाजुला करण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी आयरे गावात धोकादायक इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.