तळोजा, खारघर, पेंधरवासियांना दिलासा द्या
नवी मुंबई : दिवाळीपूर्वी नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन करा अन्यथा एमआयएम या सेवेचे प्रतिकात्मक उद्घाटन करणार असल्याचा इशारा एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तसेच नवी मुंबई-रायगडचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
मुंबई-गोवा मार्गाप्रमाणेच नवी मुंबई मेट्रो सेवा लांबणीवर पडत चालली आहे.बेलापूर ते पेंधर दरम्यान जवळपास साडे अकरा किलोमीटरदरम्यान असलेल्या नवी मुंबई मेट्रोचे काम 2013 मध्ये सुरू झालेले आहे.नवी मुंबई मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर खारघर,तळोजा,पेंधर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली.मोठ्या संख्येने गृहनिर्माण प्रकल्प उभे राहीले आहेत.हजारोंच्या संख्येने मुंबई, ठाण्यातून रहीवाशी या ठिकाणी सदनिका घेवून निवासी वास्तव्यासही आले. आज तळोजा फेज एक आणि फेज दोनची लोकसंख्या एक लाखाहूनही अधिक आहे.खारघरची लोकसंख्या जवळपास ५० हजाराच्या घरात आहे.पेंधरचीही लोकसंख्या वाढत चालली आहे.मेट्रोची सुविधा मिळणार म्हणून नागरीकरण वेगाने झाले,परंतु एक दशकानंतरही मेट्रो सुरू न झाल्याने रहीवाशी प्रवासी सुविधेअभावी आता पुन्हा नवी मुंबई-ठाण्याकडे वास्तव्यासाठी जावू लागले असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले .
नवी मुंबई मेट्रोचे बेलापुर ते पेंधर तळोजादरम्यानचे काम चार-सहा महिन्यापूर्वीच काम पूर्ण झालेले आहे.दीड महिन्यापूर्वीच रेल्वेने मेट्रोचे काम पूर्ण झाल्याचे सिडकोला लेखी स्वरूपात कळविले आहे.आजमितीस तळोजा,पेंधर,खारघर,बेलापूर दरम्यान मेट्रो सुरू न झाल्याने तसेच एनएमएमटीच्या बसेस संख्येने कमी असल्याने रहीवाशांना प्रवासासाठी दररोज खासगी प्रवासी वाहनांना २५० ते ३०० रुपये एकावेळेस मोजावे लागत आहेत.यामुळे मेट्रो सुरु नसल्याने लोकांच्या खिशाला आर्थिक फटका बसत असून वेळेचाही अपव्यय होत आहे.वेळ व पैसा जात असल्याने तसेच पुरेशी प्रवासी सुविधा नसल्याने लोक निवासी वास्तव्यासाठी पुन्हा नवी मुंबई, ठाणे,पनवेलला पसंती देवू लागले आहेत.हे चित्र शोभनीय नाही.
मेट्रोचे काम चार-सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. दीड महिन्यापूर्वीच रेल्वेने सिडकोला तसे लेखीही कळविले आहे.त्यामुळे आता नवी मुंबई मेट्रोचे सरकारने लवकरात लवकर लोर्कापण करणे आवश्यक आहे. स्थानिक रहीवाशांना पेंधर,तळोजा येथून बेलापूरला येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे व खिशालाही आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.राज्य सरकारने १४ नोव्हेंबर दिवाळी पाडवापूर्वी नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन न केल्यास एमआयएमच्यावतीने या नवी मुंबई मेट्रोचे प्रतिकात्मक स्वरूपात लोकार्पण करून या समस्येकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष वेधू.राज्य सरकारने या प्रकरणी स्थानिक रहीवाशांना होत असलेला त्रास पाहता लवकरात लवकर दिवाळीपूर्वी नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन करून तळोजा, खारघर, पेंधरवासियांना दिलासा द्यावा व प्रवासासाठी दररोज सहन कराव्या लागणाऱ्या त्रासातून त्यांची मुक्तता करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.