नांदेड- हाफकीननं औषधी खरेदी बंद केल्यामुळं राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नसल्यानं जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधील शासकीय रुग्णालयात पुढं आलाय. येथे 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झालाय. त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी अधिष्ठात्याची प्रतिक्रियानांदेड :
जिल्ह्यात तब्बल बारा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं आरोग्य यंत्रणेची लक्तरं वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा जास्तीचा समावेश होता, असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेमुळं नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून, प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
रुग्णांवरच औषधांचा भार :
या घटनेबद्दल डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, नांदेड येथील अधिष्ठता एस. आर. वाकोडे यांनी माहिती दिली आहे. तसेच औषधांची कमतरता असल्यानं सध्या रुग्णांवरच औषधांचा भार पडत असल्याची प्रतिक्रिया सामान्य रुग्णालयातील नातेवाईकांनी दिली आहे.
नांदेड भागात 70 ते 80 किमीच्या परिसरात एवढं मोठं रुग्णालय नाही. त्यामुळं रुग्ण आमच्या रुग्णालयात भरती होतात. सध्या येथे 12 नवजात बालकांचा मृत्यू झालाय. कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळं मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र, रुग्णसेवेवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. औषधांची खरेदी होऊ न शकल्यानं अडचण निर्माण झाली आहे – एस. आर. वाकोडे, अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय, नांदेड
कर्मचाऱ्यांची कमतरता आणि रुग्णांची अवहेलना :
रुग्णालयात कर्मचारी, डॉक्टर, नर्सची कमतरता आहे. अशातच रुग्णालयात इतर जिल्ह्यातून व तेलंगाणा राज्यातून देखील अनेक रुग्ण दाखल होतात. त्यामुळं कर्मचारी सेवेवरील ताण वाढून रुग्णांची अवहेलना होते. या रुग्णालयात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच औषधांची कमतरता व डॉक्टरांचे पुरेसे मनुष्यबळ नसल्यानं रुग्णसेवा ही खंडित पडत आहे. मागील 24 तासात बारा नवजात बालके यात सहा मुली व सहा मुले यांचा मृत्यू झालाय. तसेच इतर गंभीर आजार सर्पदंश व इतर आजारानं बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी दिली.
परिस्थिती चिंताजनक :
नांदेडमधील शासकीय रुग्णालयाला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी रात्री भेट दिली. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सुमारे 24 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळं मी येथे येऊन डीनची भेट घेतली. परिस्थिती चिंताजनक आणि गंभीर आहे. सरकारनं याची दखल घ्यावी आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अजूनही सुमारे ७० रुग्ण गंभीर आहेत. सरकारनं सर्व आवश्यक मदत आणि संसाधनं येथे दिली पाहिजेत. येथील परिस्थिती चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.