ऐकावे ते नवलच……,म्हशीने दिड लाखाचे मंगळसूत्र गिळले; डाँक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढले…

Spread the love

वाशिम- जनावरांनी एखादी मौल्यवान वस्तू गिळल्याच्या बातम्या गाव-खेड्यांत वरचेवर ऐकायला मिळतात. छोटी-मोठी वस्तू असेल तर त्यावर पाणी सोडलं जातं, पण एखादी मौल्यवान वस्तू असेल तर संबंधितांची मोठीच पंचाईत होऊन जाते. त्यातून एखादा अनाकलनीय निर्णय घेतला जातो. वाशिम जिल्ह्यात अशीच काहीशी घटना घडली आहे. इथल्या एका शेतकऱ्याच्या घरातील म्हशीनं दीड लाखांचं मंगळसूत्र गिळलं. त्यानंतर जे घडलं ते चकीत करून टाकणारं आहे.

रामहरी नावाच्या शेतकऱ्याच्या घरात रविवारी ही घटना घडली. आंघोळीसाठी जात असताना रामहरी यांच्या बायकोनं तिचं मंगळसूत्र काढून ठेवलं. पण चुकून तिनं ते सोयबीन आणि शेंगणदाण्याची टरफलं ठेवलेल्या प्लेटमध्ये ठेवलं. आंघोळ करून आली तेव्हा ती पुन्हा मंगळसूत्र घालायला विसरली. त्यानंतर तिनं ताटात पडलेल्या साली आणि टरफलं म्हशीला खायला घातली आणि घरातली इतर कामं करायला लागली. थोड्या वेळानं आपण मंगळसूत्रच घातलं नसल्याचं तिच्या लक्षात आलं. शोधाशोध करूनही ते सापडेना. अचानक तिला आठवलं की आपण मंगळसूत्र शेगदाण्याची टरफलं असलेल्या घमेल्यात ठेवलं होतं आणि तेच घमेलं म्हशीसमोर ठेवलं.

ती धावत धावत म्हशीच्या गोठ्यापर्यंत गेली. पण तोपर्यंत म्हशीनं संपूर्ण घमेलं रिकामं केलं होतं. तिनं हा सगळा घटनाक्रम नवऱ्याला सांगितला. मंगळसूत्र परत मिळवायचं असेल तर काहीतरी करणं भाग आहे हे रामहरी यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेचच स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डाँ. बाळासाहेब कोंडाणे यांना फोन केला. डॉक्टरांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीनं म्हशीच्या पोटाची तपासणी केली, तेव्हा म्हशीच्या पोटात वेगळ्या प्रकारचा एखादा धातू असावा असा संशय त्यांना आला. इकडं रामहरी आणि त्यांच्या पत्नीची घालमेल सुरू होती. दीड लाखाचं मंगळसूत्र गमवावं लागतं की काय? अशी धाकधूक त्यांना वाटू लागली. शेवटी डॉक्टरांशी बोलून म्हशीच्या पोटावर शस्त्रक्रिया करायचा निर्णय घेण्यात आला. डाँक्टरांनी हे ऑपरेशन करून शेवटी ते मंगळसूत्र काढण्यात आलं. सुमारे दोन तास हे ऑपरेशन चाललं. म्हशीला ६० ते ६५ टाके पडले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page