
गुवाहाटी : सध्या शहरातून खासगी वाहनाने प्रवास करायचा असेल तर काळ्या पिवळ्या टॅक्सीपेक्षा ओला-उबेरला सर्वाधिक पसंती मिळते. ओला-उबेरमुळे रिक्षा-टॅक्सीच्या भाडेदरात कमी पैशात एसी गाडीतून प्रवास करता येतो. शिवाय अनेकदा विशेष ऑफरचा लाभ सुद्धा मिळतो. परंतु आता कदाचित भारतातील एका शहरात ओला-उबेरची कॅब सेवा बंद होणार आहे. ही सेवा बंद करण्याचा निर्णय ऑल आसाम कॅब मजदूर संध आणि ऑल गुवाहाटी बाइक आणि टॅक्सी युनियनने घेतला आहे.
देशातील मोठ-मोठ्या शहरांमध्ये ओला-उबेरने मोठ्या प्रमाणात सेवा दिली जाते. सध्या अनेक छोट्या शहरांमध्येही ओला आणि उबेरची दिली जात आहे. परंतु ईशान्येतील गुवाहाटीमध्ये ओला-उबेरची ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारण म्हणजे कॅब एग्रीगेटर्सकडून कॅब चालकांचा छळ होत असल्याचा आरोप कॅब मजदूर संघ आणि ऑल गुवाहाटी बाइक आणि टॅक्सी युनियनने केला आहे. कंपनीने चालकांना दिलेली सेवा ही दिशाभूल करणारी असून यामुळे चालकांची पिळवणूक होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे ऑल आसाम कॅब मजदूर संध आणि ऑल गुवाहाटी बाइक आणि टॅक्सी युनियनने ओला-उबेरची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून ईशान्य गुवाहाटीमध्ये आता ओला-उबेर सेवेचा लाभ घेता येणार नाही.