कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

Spread the love

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर

ठाणे : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.  

 विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी दि. 30 जानेवारी रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली पार पडली यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून विशाल सोलंकी उपस्थित होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड चे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, पालघर चे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपायुक्त मनोज रानडे आदी उपस्थित होते.

 काल  सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. एकूण 99 मतपेट्या मध्ये मतपत्रिका होत्या. मतमोजणी साठी एकूण 28 टेबले ठेवण्यात आली होती. या निवडणुकीत एकूण  35069 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 33450 मते वैध ठरली तर  1619 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 16726 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला होता. 

 

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे 

 

ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे – 20683

धनाजी नानासाहेब पाटील – 1490

तुषार वसंतराव भालेराव – 90

उस्मान इब्राहिम रोहेकर – 75

 रमेश नामदेव देवरुखकर – 36

 बाळाराम दत्तात्रेय पाटील – 10997

 राजेश संभाजी सोनवणे – 63

 संतोष मोतीराम डामसे –  16 

 

 पहिल्या पसंतीची 20,683 मते मिळवून जिंकून येण्यासाठीचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याणकर यांनी जाहीर केले. मतमोजणी साठी कोकण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page