Jaishankar on Khalistani : कॅनडा सरकार खलिस्तानींना पाठिशी घालतंय, भारताच्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

Spread the love

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जकार्ता येथे आसियान प्रादेशिक मंचाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी चिनी मुत्सद्दी वांग यी यांचीही भेट घेतली.

न्यूयॉर्क ,अमेरिका- भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी खलिस्तानच्या मुद्द्यावर भाष्य करत कॅनडा (Canada) वर निशाणा साधला आहे. कॅनडामध्ये हिंसा भडकावणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, असं वक्तव्य जयशंकर यांनी केलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जकार्ता येथे आसियान प्रादेशिक मंचाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी खलिस्तानच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. जयशंकर यांनी कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मिलानी जॉली यांची भेट घेऊन खलिस्तानचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला.

खालिस्तान समर्थकांना भारत सरकार चोख उत्तर देणार?

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी, 14 जुलै रोजी आसियान प्रादेशिक मंचाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट झाली. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी हिंसाचार भडकावणाऱ्यांशी कठोरपणे वागण्याचा आणि कॅनडातील भारतीय मुत्सद्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितलं. तसेच जयशंकर यांनी चीनचे मुत्सद्दी वांग यी यांची भेट घेऊन सीमावादाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चाही केली.

‘हिंसा भडकावणाऱ्यांना अद्दल घडवण्याची गरज’

कॅनडाचे परराष्ट्र मंत्री जॉली यांच्या भेटीनंतर जयशंकर यांनी ट्विट केले की, “जकार्ता येथे कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जॉली यांची भेट घेतली आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्र आणि आमच्या आर्थिक सहकार्यावर चर्चा केली.” भारताच्या राजदुतांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि हिंसाचाराला उत्तेजन देणार्‍या परिस्थितीला खंबीरपणे सामोरं जाण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कॅनडा पंतप्रधानांची प्रतिक्रिया हे मतांचं राजकारण’

जयशंकर यांनी यापूर्वी म्हटलं होतं की, खलिस्तानी मुद्द्यावर कॅनडा पंतप्रधानांची प्रतिक्रिया हे मतांचं राजकारण असल्याचं दिसून येतं. अलिकडे परदेशात खलिस्तानी समर्थकांचे हल्ले वाढत आहेत. कॅनडामध्येही खलिस्तानी आक्रमक होत असताना सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांनी पाठीशी घालताना दिसत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत भारत-कॅनडा संबंधांवर अनेक परिणाम झाले आहेत. भारताने कॅनडाला खलिस्तान समर्थकांना प्रोत्साहन देण्यापासून परावृत्त करण्याचं वारंवार आवाहन केलं आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडामधील खलिस्तानी समर्थकांवर भाष्य करताना म्हटलं होतं की, कॅनडाच्या भूमीवर प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा भारताने तीव्र निषेध केला होता. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं होतं की, अशा स्वातंत्र्याचा वापर हिंसाचाराला उत्तेजन देण्यासाठी किंवा दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकत नाही.

भारत -चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी राजदुतांची भेट

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी सीमावर्ती भागातील शांतता आणि स्थैर्याबाबत न सुटलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी चिनी राजदूत वांग यी यांची भेट घेतली. इंडोनेशियाच्या राजधानीत ASEAN प्रादेशिक मंच (ARF) च्या मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यानच ही बैठक झाली. जयशंकर यांनी या भेटीबाबत ट्विट माहिती दिली. वांग यी, जे सध्या सीपीसी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाच्या कार्यालयाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत, चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग आजारी असल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहिले होते. वांग यी यांच्याशी सीमावर्ती भागातील शांततेशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केल्याची माहिती जयशंकर यांनी ट्वीट करत दिली आहे. भारत आणि चीन यांच्यात गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सीमासंघर्ष सुरु आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page