चिपळूण शहराध्यक्षपदी श्रीराम शिंदे यांची निवड
चिपळूण – भारतीय जनता पार्टीच्या पक्ष घटनेनुसार दर तीन वर्षांनी राष्ट्रीय स्तरापासून ते मंडल स्तरापर्यंत पदाधिकारी नियुक्ती केली जाते. त्याला अनुसरून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रथम प्रदेश पदाधिकारी व नंतर जिल्हाध्यक्षांच्या तसेच 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या.
त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रभारी आणि विभागीय संघटन मंत्री यांच्या उपस्थितीत मंडल अध्यक्ष यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या तसेच इतर पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा प्रभारी म्हणून कोल्हापूरचे महेश जाधव तसेच कोकण विभागीय संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी या मुलाखती घेतल्या.
गणेशोत्सव पूर्वी उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपाचे अध्यक्ष श्री. केदार साठे यांनी जिल्हा कार्यकारिणीची पहिली यादी जाहीर केली होती. मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या गणेशोत्सवानंतर केल्या जातील असे जाहीर केले होते.
याच पार्श्वभूमीवर आज दिनांक २७ रोजी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडळ अध्यक्ष म्हणजेच तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच काही जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली.
यामध्ये चिपळूण शहराध्यक्षपदी श्रीराम शिंदे, चिपळूण ग्रामीण पूर्व (चिपळूण विधानसभा) तालुका अध्यक्षपदी वसंत ताम्हणकर ,चिपळूण ग्रामीण पश्चिम (गुहागर विधानसभा) तालुका अध्यक्षपदी अजित थरवळ, गुहागर तालुकाध्यक्षपदी निलेश सुर्वे ,दापोली तालुकाध्यक्षपदी संजय सावंत, खेड दक्षिण तालुकाध्यक्षपदी किशोर आंब्रे ,खेड उत्तर तालुका अध्यक्षपदी ऋषिकेश मोरे, मंडणगड तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण उर्फ आप्पा मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच काही जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा चिटणीस म्हणून चिपळूणचे मधुकर निमकर आणि दसपटी मधील सचिन शिंदे यांना जबाबदारी देण्यात आली तर उत्तर रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक प्रकोष्ठ संयोजक पदी आर्या चितळे यांची नियुक्ती करण्यात आली.