वर्षभर मोफत रेशन मिळणार.
जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | फेब्रुवारी ०२, २०२३.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सुरू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी १ वर्षाने वाढवण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी केली. यामुळे आता देशातील गरिबांना पुढील वर्षभर रेशन दुकानांवर मोफत अन्नधान्य मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्पात या योजनेविषयी माहिती दिली आहे.
सीतारमन म्हणाल्या की, “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार २ लाख कोटी रुपयांचा भार उचलत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी सुलभ करणे, वाढ आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि व्यापक आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे.
कोरोना महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ८० कोटींहून अधिक लोकांना २८ महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य पुरवण्यात आले. देशातील कोणीही उपाशी झोपणार नाही असे यामागचे उद्दिष्ट होते. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही १ जानेवारी २०२३ पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सर्व अंत्योदय आणि कुटुंबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करणारी योजना राबवत आहोत, असेही त्या म्हणाल्या.