कोलंबो,श्रीलंका- आशिया कपच्या सुपर फोर फेरीतील पाचव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. यासह श्रीलंकेच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका संघात फायनल सामना खेळला जाणार आहे.
आशिया कपच्या सुपर फोर फेरीतील पाचव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. यासह श्रीलंकेच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ४२ षटकांत २५२ धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेसमोर २५२ धावांचे लक्ष्य होते आणि श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर आठ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. त्याचबरोबर आशिया चषकाच्या फायनलमध्ये ११व्यांदा मुसंडी मारली आहे.
या सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अगोदरच अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र, आता अंतिम फेरीत भारताला श्रीलंका संघ आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका संघाचा सामना पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे.
२५३ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या श्रीलंका संघाला पहिला धक्का २० धावांच्या स्कोअरवर बसला. कुसल परेरा आठ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने १७ धावा करून बाद झाला. त्याला शादाब खानच्या अचूक थ्रोने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर ७७ धावसंख्येवर संघाला दुसरा धक्का बसला. पथुम निसांका ४४ चेंडूत २९ धावा करून बाद झाला. शादाब खानने त्याला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले.
कुसल मेंडिसचे अवघ्या नऊ धावांनी हुकले शतक –
यानंतर श्रीलंका संघाची १७७ धावांवर तिसरी विकेट पडली. सदिरा समरविक्रमा ५१ चेंडूत ४८ धावा करून बाद झाली. त्याने कुसल मेंडिससोबत शतकी भागीदारी केली. इफ्तिखार अहमदच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने त्याला यष्टीचित केले. श्रीलंकेची चौथी विकेट २१० धावांवर पडली. कुसल मेंडिस ८७ चेंडूत ९१ धावा करून बाद झाला. इफ्तिखार अहमदच्या चेंडूवर मोहम्मद हारिसने शानदार झेल घेतला. मेंडिसने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. २२२ धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची पाचवी विकेट पडली. कर्णधार दासुन शनाका चार चेंडूत दोन धावा करून बाद झाला. इफ्तिखार अहमदने त्याला मोहम्मद नवाजकरवी झेलबाद केले.
कुसल मेंडिस निर्णायक वेळी झाला बाद , असलंकाने मिळवून दिला विजय
कुसल मेंडिस श्रीलंकेच्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी एका टोकाकडून सातत्याने प्रयत्न करत होता, पण त्याच दरम्यान त्याने ९१ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर आपली विकेट गमावली. यानंतर श्रीलंकेने २२२ धावांवर कर्णधार दासुन शनाकाच्या रूपाने पाचवी विकेट गमावली. चारिथ असलंकाने एका टोकापासून डावावर नियंत्रण ठेवले आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून परतला. या सामन्यात चरित असलंकाने ४९ धावांची नाबाद खेळी खेळली. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने ३ आणि शाहीन आफ्रिदीने २ बळी घेतले.
पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने खेळली सर्वाधिक धावांची खेळी –
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ४२ षटकांत ८ गडी गमावून २५२ धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेसमोर २५३ धावांचे लक्ष्य होते. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक नाबाद ८६ धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ५२ धावांची खेळी केली. इफ्तिखारने ४७ धावांचे योगदान दिले. त्याने रिझवानसोबत शतकी भागीदारी करत सामन्यात पाकिस्तानचे दमदार पुनरागमन केले. श्रीलंकेकडून पाथिरानाने तीन आणि मदुशनने दोन विकेट्स मिळाल्या. तिक्ष्णा आणि वेल्लालगे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.