जनशक्तीचा दबाव न्यूज | माखजन | सप्टेंबर १३, २०२३.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर तसेच कणकवली विधानसभेचे माजी आमदार, महाराष्ट्र शासनाच्या सिंधुरत्न योजना समितीचे सदस्य तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार, भाजपा संगमेश्वर तालुकाध्यक्ष व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांनी काल ‘महाविजय २०२४’ अभियानांतर्गत लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून कुणबी समाजाचे आघाडीचे नेते, बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेशजी भायजे यांची त्यांच्या पोंक्षे आंबव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
सुरेश भायजे यांनी उमेदीच्या काळात संगमेश्वर-लांजा विधानसभा निवडणूक लढवली होती. अशी माहिती भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री. शैलेंद्र धामणस्कर यांनी दिली. कुणबी समाजबांधवांनी त्यावेळी समयोचित सहकार्य केले होते मात्र निवडणुकीतील हार-जीत हा एक सामाजिक प्रयोग असतो. त्यामुळे झालेल्या पराभवानंतरही नाराज होऊन खचून न जाता त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. कुणबी समाजबांधवांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. स्थानिक रोजगार निर्मितीचा प्रयत्न काहीअंशी अयशस्वी झाला खरा मात्र त्यानंतरही त्यांनी अनेकांना रोजगार आणि नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.
कोकणात, खासकरून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रात कुणबी समाज बहुसंख्य असून आजही या समाजाच्या अपेक्षा पूर्ण झाल्याचे पहावयास मिळत नाही. शिवाय युवा वर्ग नोकरी-व्यवसायानिमित्त मोठ्या संख्येने शहरांत स्थलांतरित होत असल्याने खेडी ओस पडत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच यासाठी सरकारच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती श्री. भायजे यांनी केली. “मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत असलेले विद्यमान डबल इंजिन सरकार याबाबत सकारात्मक असून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आहे. एका बाजूचे काम जवळपास ९०% पूर्ण झाले आहे. पुढील काम लवकरच पूर्ण होईल. आपल्या चाकरमान्यांना गावाकडे स्थायिक करण्यासाठी आपण पहिले पाऊल महामार्गाच्या माध्यमातून उचलले आहे. पुढे कृषी, पर्यटन, दुग्धव्यवसाय व पशुपालन, पायाभूत सुविधा, शिक्षण, व्यापार आणि अन्य उद्योग यांबाबत क्रमाने ठोस निर्णय घेतले जातील. त्यामुळे कोकणची पुढील पिढी स्वयंपूर्ण होईल. स्वातंत्र्याच्या अमृत काळात मा. मोदीजींना जो आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे त्यासाठी आत्मनिर्भर कोकण बनवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल.” अशी चर्चा यावेळी झाली.
सदर सदिच्छा भेटीसाठी धामापूर जि.प. गटाचे प्रभारी श्री. प्रशांत रानडे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. अनिल घोसाळकर, युवा नेते व ग्रामंचायत डिंगणीचे उपसरपंच श्री. मिथुन निकम आदी उपस्थित होते.