जळगाव- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मागील १५ दिवसापासून आंदोलन सुरु आहे. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे अशा विनंतीचा ठराव सर्वपक्षीय बैठकीत काल मंजूर झाला. उपोषणामुळे मनोज पाटलांची प्रकृती देखील खालावली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खास संदेश घेऊन विशेष विमानाने जालन्यातील आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. उदय सामंत आज जळगावात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी होणार होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना विशेष संदेश देऊन मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने जालनासाठी रवाना होत आहेत.