पुणे- पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात मॉन्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. काल सकाळपासून ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका कमी झाला आहे. तसेच अनेक भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळल्याने बळीराजा सुखावला आहे. आजही कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आाल आहे. तसेच मराठवाडा, आणि विदर्भातील काही जिल्ह्यता विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळपासूनच राज्याच्या विविध भागात पावसाला सुरूवात झाली आहे.
कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर ओडिशा आणि छत्तीसगड परिसरावर समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली मध्य प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून, जैसलमेर, उदयपूर, इंदोर, बेतूल, गोंदिया, रायपूर, गोपालपूर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे.