जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | सप्टेंबर ०७, २०२३.
ग्रामीण भागात ग्राम सभेमध्ये मतदार यादीचे वाचन करावे, त्याचबरोबर शहरी भागात प्रभागनिहाय मतदार यादीचे वाचन करुन त्याबाबत मतदारांची खात्री करावी. मतदानाची टक्केवारी जिथे कमी आहे त्याची कारणे शोधून त्याबाबत अभ्यास करा. त्याचबरोबर मतदान केंद्रावर सुविधा देण्याबाबत सर्वेक्षण करावे, असे निर्देश अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले. श्री. देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक विषयक कामांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मिन, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन जिल्ह्याची माहिती दिली. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख १५ हजार ६९ इतकी आहे. त्यामध्ये ८ लाख ५३ हजार ९४८ महिलांची तर ७ लाख ६१ हजार १२१ पुरुषांची संख्या आहे. दर हजार पुरुषांमागे स्त्रीयांची ११२२ संख्या आहे. ग्रामीण लोकसंख्या १३ लाख ५१ हजार ३४६ आहे तर शहरी लोकसंख्या २ लाख ६३ हजार ७२३ आहे. १३ लाख ३१ हजार १५० इतकी मतदार संख्या आहे.
यामध्ये ६ लाख ८८ हजार ७४३ स्त्री मतदार तर ६ लाख ४२ हजार २९६ पुरुष मतदार आहेत. तृतीय पंथी मतदार ११ असून दिव्यांग मतदारांची संख्या ५ हजार ६९५ इतकी आहे. १८ ते १९ वयोगटातील १३ हजार ३८९ तर ८० वर्षांपुढील ५९ हजार ३५३ मतदार संख्या आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी जिल्ह्यातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मयत मतदार, स्थलांतरीत मतदार वगळण्याबाबत बीएलओंमार्फत खात्री करावी. नोटीस पाठवून त्याबाबत पंचनामा करुन दिलेली योग्य प्रक्रिया राबवावी. मतदान केंद्राच्या ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत का, दिव्यांगांसाठी रँप आहे का, वीजेचा पुरवठा याबाबत सर्वेक्षण करुन योग्य नियोजन करावे.
८० वर्षांपुढील मतदारांबाबत आजारी, अंथरुणांवर असलेले मतदारांबाबत माहिती गोळा करुन त्यांना तशी सुविधा देण्याबाबत कार्यवाही करावी. मतदार जनजागृतीबाबत मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा, पथनाट्याचा वापर करावा. ‘निर्धार मतदारांचा, मी मतदान करणारच’ ही स्वाक्षरी मोहीम राबवावी. आकाशवाणी, स्थानिक वाहिन्या, वर्तमानपत्रे, समाजमाध्यमे यामधून जनजागृती करावी. चित्रकला, रांगोळी, पोस्टल, वक्तृत्व स्पर्धांमधून जनजागृती करावी. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी मतदार जनजागृती मोहिमेबाबत सादरीकरण केले. यावेळी उत्पादन शुल्क अधीक्षक सागर धोमकर यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.