अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांप्रमाणे कोकणातील आंबा, काजू व्यवसायिकांचाही विचार व्हावा…

Spread the love

भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष.

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | सप्टेंबर ०७, २०२३.

ज्याप्रमाणे आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचप्रमाणे कोकणातील आंबा, काजू बागायतदार आणि व्यावसायिकसुद्धा अडचणीत असून त्यांचासुद्धा विचार व्हावा, अशी मागणी भाजपाचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसे ट्विट त्यांनी केले आहे.

राज्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या आणि आर्थिक अडचणीत आलेल्या सहकारी साखर कारखान्यांना संजीवनी देण्यासाठी त्यांना शासन हमीवर मुदतीचे कर्ज देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर मुदती कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी धोरण जाहीर करण्यात आलं असून FACR मूल्याच्या १.५ पट इतकं कर्ज त्यांना दिला जाणार आहे. यासाठी शासनाने एकूण ३२ अटी ठेवल्या आहेत. त्याची कारखान्यांना पूर्तता करावी लागणार आहे. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यातून डबघाईला आलेल्या अनेक साखर कारखान्यांना मोठा मदतीचा हात शासनाकडून मिळणार आहे.

मात्र ज्याप्रमाणे साखर कारखानदार अडचणीत आहेत त्याप्रमाणे कोकणातील मुख्य पीक असलेल्या आंबा काजू पिकाचे बागातदार आणि व्यावसायिक सुद्धा अडचणीत असून त्यांनाही मदतीची गरज आहे याकडे भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शासनाचे लक्ष वेधलं आहे. कोकणात मासळी पाठोपाठ आंबाआणि काजू ही फळ पिके मुख्य पिके आहेत. मात्र हवामानावर आधारित या पिकांना गेले अनेक वर्ष हवामान बदलाचा मोठा फटका बसला असून अनेक बागायतदार आणि व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. आपल्या या अडचणी शासनाने सोडवाव्यात यासाठी हे बागायतदार आणि व्यावसायिक सातत्याने वेगवेगळ्या आंदोलने, परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे दाद मागत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांसोबतच कोकणातील या बागायतदार आणि व्यावसायिकांचाही शासनाने विचार करावा अशी मागणी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कोकणच्या प्रश्नांसाठी सातत्याने उचलून धरणाऱ्या निलेश राणे यांनी यापूर्वीही आंबा, काजू व्यावसायिकांच्या अडचणीसाठी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page