सरकारने चार दिवसात जीआर काढावा; उपोषण सुरूच राहणार- मनोज जरांगे
जालना- मनोज जरांगे गेल्या आठ दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. हे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारमार्फत प्रयत्न सुरू आहेत. आजही सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला आलं होतं. यावेळी झालेल्या चर्चेत मनोज जरांगेंनी सरकारला ४ दिवसांची मुदत दिल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारला समितीचा अहवाल घ्यायचाय. मात्र मी आंदोलन मागे घेतलेलं नाही. समाजाच्या वतीने मी त्यांना मोकळ्यापणाने ४ दिवसांचा वेळ दिलाय. ४ दिवसांत ते आरक्षणाचा जीआर घेऊन येतील. तेव्हा त्यांचं स्वागत करू. ४ दिवस वाट बघावी लागेल, असं जरांगे पाटील यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
शिष्ठमंडळाने जरांगेची भेट घेत बैठकीसाठी मुंबईला सोबत येण्याची विनंती केली. मात्र, गरज नसतांना तुम्ही वेळ मागताय. त्यापेक्षा मी असा मेलेलो बरा. मी समाजाला शब्द दिलाय आरक्षणाची ही शेवटची लढाई लढतोय, असंही जरांगे यावेळी म्हणाले. मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची लढाई लढत आहे. आतापर्यंत अनेक मुक मोर्चे देखील काढण्यात आलेत. अशात शुक्रवारी देखील जालन्यात आंदोलन सुरू होते. यावेळी पोलिसांकडून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेमुळे मराठा आंदोलन आनखी पेटल्याचं दिसलं. अशात यात जरांगे देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर बसले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आज आलेल्या शिष्ठमंडळाला जरांगे यांनी ४ दिवसांची मुदत दिली असून उपोषण कायम ठेवलं आहे.