
मुंबई :- राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातर्फे (बालभारती) छपाई केलेल्या इयत्ता तिसरीच्या मराठी माध्यमाच्या परिसर अभ्यास या विषयाच्या पुस्तकातील नकाशात पालघर जिल्ह्यातील तालुक्यांची नावे चुकीची छापण्यात आली आहेत. वाडा तालुक्याचा उल्लेख या नकाशात वाडे, तर मोखाडाचा उल्लेख मोखाडे असा आहे. त्यामुळे तिसरीत शिकणारी मुले तालुक्याचा उल्लेख चुकीचा करत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ पासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा अस्तित्वात आला. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत. त्यात जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू व वाडा या तालुक्यांचा समावेश आहे.
यावर्षी नव्याने दिलेल्या तिसरीच्या एकात्मिक पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील नकाशाची मैत्री हा अध्ययनात पालघर जिल्ह्याची नकाशासह माहिती देण्यात आली आहे. या माहितीत दोन तालुक्यांची माहिती चुकीची देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या वाडा तालुक्याला वाडे असे नमूद केले आहे, तर नाशिक जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या मोखाडा या तालुक्याला या नकाशात मोखाडे असे म्हटले आहे.