०२ सप्टेंबर/पुणे-सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाची परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील धरणाची स्थिती चांगली आहे. पुढील महिन्याभरात पावसाचे प्रमाण कसे राहते त्यावर लक्ष ठेऊन ऑक्टोबरमध्ये पुढील नियोजन ठरविण्यात येईल.
पवना व चासकमान मध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही, असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.