जनशक्तीचा दबाव न्यूज | फेब्रुवारी १, २०२३.
✍🏻 सचिन यादव / संगमेश्वर…
प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती कला अवगत असतेच अशातच एक आगळीवेगळी कला जोपासली आहे ती संगमेश्वर तालुक्यातील धामणी गुरववाडी येथील हरीश्चंद्र गुरव यांनी.
गेली पाच दशके त्यांनी सनई वादनाची कला आत्मसात केली आहे. गावात लग्न असल्यास किंवा शिमगोत्सवात गावागावांत पालखी सोबत ढोल-ताशा ही वाद्ये सर्रास दिसून येतात, पण धामणी गावात याशिवाय आढळणारे वाद्य म्हणजे सनई.
हरीश्चंद्र गंगाराम गुरव हे स्थानिक कलाकार गेली पाच दशके सनई वादन करत आहेत. सनई या वाद्याची मंगलवाद्य अशी ओळख आहे, पण सध्या हे वादन वाजविणारे कलाकार दुर्मिळ झाले आहेत, असे असताना देखील धामणी गावातील हरिश्चंद्र गुरव हे गेली पाच दशक ही कला जोपासत आले आहेत.
हरिश्चंद्र गुरव यांचे सध्याचे वय साठीच्या पुढे आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी आपल्या कलेला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी या वाद्याचे रितसर शिक्षण कुठेही घेतलेले नाही, यापूर्वी ते बासरी वाजवत होते आणि त्यानंतर त्यांनी सनई वाद्यांचा प्रारंभ केला. स्वतःच शिकत आणि नवनवीन प्रयोग करत त्यांनी हे वाद्य आत्मसात केले आहे.
गावच्या होळीसाठी माड तोडण्यापासुन त्यांच्या वादनाची सुरुवात होते ती अगदी पालखी रांजणी जाईपर्यंत होळी उभी करताना जशी ढोल वाजण्याची प्रथा आहे तसेच सनई वादनही केले जाते. त्यानंतर गावातील घरोघरी पालखी सोबत अन्य वादनासोबत हरीश्चंद्र गुरव यांच्या सनईचे सुरसुध्दा सोबत असतात.
त्यांच्या जोडीला त्यांचें बंधू दाजी गुरव हे देखील सुरात सूर द्यायचे परंतु पाच वर्षांपूर्वी त्यांचं निधन झाले परंतु त्यानंतर दाजी गुरव यांचे पुत्र रत्नाकर गुरव आणि गोपाळ गुरव यांच्या सहकार्याने सनई वादनाची परंपरा अखंडित चालू ठेवली आहे .
हरीश्चंद्र गुरव यांची कला पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेच परंतु संगमेश्वर, कसबा, माखजन, सोनवडे आदी गावात देखील त्यांना शिंपण्यात निमंत्रित केले जाते. शिमग्यातून पालखीबरोबर घरोघरी फिरून सनई वादन करताना सेवा करण्याची संधी मिळते . घराघरांतून त्या बदल्यात बिदागी मिळते. तो मान असतो. आजूबाजूच्या गावातून सुध्दा आम्हाला निमंत्रित केले जाते त्या निमित्ताने तिथेदेखील सेवा करण्याची संधी उपलब्ध होते अशी भावना हरीश्चंद्र गुरव यांनी व्यक्त केली.