नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये (CAPF) भरती झालेल्या ५१,००० हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रे वितरित केली आणि त्यांना ‘अमृत रक्षक’ म्हटले आहे. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या भरती झालेल्या जवानांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, देश अभिमान आणि आत्मविश्वासाने भरलेला असताना अशा वातावरणात हा रोजगार मेळावा आयोजित केला जात आहे. हैदराबादमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी आज सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संबोधित केले.
पीएम मोदी म्हणाले की, ऑटोमोबाईल, फार्मा क्षेत्र खूप वेगाने विकसित होत आहेत आणि ते आगामी काळात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करतील. पर्यटन क्षेत्र २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत २० लाख कोटी रुपयांहून अधिक योगदान देईल आणि १३-१४ कोटी नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी अन्नापासून ते औषधापर्यंत, अवकाशापासून स्टार्टअपपर्यंत सर्व क्षेत्रांचा विकास आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, नऊ वर्षांपूर्वी याच दिवशी आम्ही ‘जन धन योजना’ सुरू केली; आर्थिक लाभाबरोबरच या योजनेने रोजगार निर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे असंही त्यांनी सांगितले.
पीएम मोदी म्हणाले, “आपले चांद्रयान आणि त्याचे रोव्हर प्रज्ञान चंद्रावरून सातत्याने ऐतिहासिक छायाचित्रे पाठवत आहेत.” या दशकात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनेल; ही हमी मी पूर्ण जबाबदारीने देतो. हैदराबादमध्ये आयोजित रोजगार मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते, ते म्हणाले, गेल्या नऊ वर्षांत त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे बदलाचा आणखी एक नवीन टप्पा दिसू लागला आहे. गेल्या वर्षी भारताने विक्रमी निर्यात केली होती, जी जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंची मागणी सातत्याने वाढत असल्याचे द्योतक आहे. “वोकल फॉर लोकल या मंत्राला अनुसरून भारत सरकार मेड इन इंडिया लॅपटॉप, संगणक यांसारख्या उत्पादनांच्या खरेदीवर भर देत आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली असून, तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.
ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत सरकारने निमलष्करी दलांच्या भरती प्रक्रियेत अनेक मोठे बदल केलेत. यावेळी मोदींनी प्रधानमंत्री जन धन योजनेचाही उल्लेख केला आणि सांगितले की, खेडेगाव आणि गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणात तसेच रोजगार निर्मितीमध्ये या योजनेने मोठी भूमिका बजावली आहे. देशभरात ४५ ठिकाणी या रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
रोजगार मेळाव्याद्वारे केंद्रीय गृह मंत्रालयाने विविध केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि दिल्ली पोलिसांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या मते, हा रोजगार मेळा रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधानांच्या वचनबद्धतेला प्राधान्य देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे आणि राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग आणि सक्षमीकरणाची संधी उपलब्ध होणार आहे.